सातारा – स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाच्या पथकांनी बावधन, ता. वाई येथील एका घरावर छापा टाकून, अविनाश मोहन पिसाळ याच्याकडून पाच गावठी पिस्तुले, 78 जिवंत काडतुसे 370 रिकाम्या पुंगळ्या, दोन तलवारी, वन्यप्राण्याची शिंगे व वाघाचे नख, असा सहा लाख 20 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अविनाश पिसाळ हा पोलीस अभिलेख्यावरील गुन्हेगार आहे.
बावधन येथील अविनाश पिसाळ हा बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह बावधन नाका येथे पिसाळ याच्या निवासस्थानी छापा टाकून त्याला अटक केली. अविनाश पिसाळ याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 769 आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्याकडे वन्यप्राण्याची शिंगे आणि वाघनख कोठून आले, याचा तपास सुरू आहे.
विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, नीलेश फडतरे, सचिन चाळके, प्रवीण फडतरे, सनी आवटे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्निल कुंभार यांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले.