खंडाळा (प्रतिनिधी)- खंडाळा तालुक्यातील वडगाव पोतनीस येते कडब्याच्या गंजीला आग लागून अंदाजे २७ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव पोतनीस येथील महादेव भाऊसाहेब बोरगे (वय ६२) यांनी शेतामधील ९०० कडब्याच्या पेंड्या असलेली गंज घराच्या बाजूला ठेवली होती.
दरम्यान, मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १.२४ वाजण्याच्या सुमारास गंजीला आग लागल्याचे निदर्शनास आले. विठ्ठल भरगुडे यांनी याबाबतची कल्पना तत्काळ महादेव बोरगे यांना दूरध्वनीद्वारे दिली.
यावेळी महादेव बोरगे यांनी कडब्याच्या गंजीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कडब्याची गंज जाळून खाक झाली. या आगीमध्ये अंदाजे २७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत महादेव बोरगे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक जळीत अशी नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास यादव तपास करीत आहे.