सातारा – जिल्हास्तरावरील कार्यालयांकडून माहिती संकलित करुन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सन 2023-24 चे प्रकाशन दिलेल्या मुदतीत करुन राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल उपसंचालक डॉ. अपर्णा गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा स्तरावरील सामाजिक व आर्थिक निर्देशांका बाबत आर्थिक वर्षात झालेली प्रगती दर्शविणारे महत्वाचे सांख्यिकी प्रकाशन जिल्हा समाजिक व आर्थिक समालोचन हे दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये प्रकाशित करावयाचे असते. या प्रकाशनामध्ये जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक बाबींची माहिती असल्याने शासनाचे विविध प्रकल्प, धोरण राबविण्यासाठी उपयोगी ठरते. अभ्यासक, संशोधक विद्यार्थी यांना संशोधन अहवाल इत्यादींसाठी ते सहाय्यपूर्ण ठरते.
हे प्रकाशन विहित कालावधीत प्रकाशित करण्यासाठी उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन अधिकारी यांनी समन्वयाने जिल्हास्तरावरील कार्यालयांकडून माहिती संकलित करावयाची असते. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक डॉ. अपर्णा गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्याचे “जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सन 2023-24″ च्या प्रकाशनासाठी जिल्हास्तरावरील संबंधित कार्यालयांकडून माहिती संकलित करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित केली होती.
या प्रकाशनासाठीची आवश्यक अद्ययावत व अचूक माहिती घेवून शासनाने दिलेल्या मुदतीत “जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” हे प्रकाशन नाविण्यपूर्ण पध्दतीने प्रकाशित केले आहे. नियोजन विभागाचे उपायुक्त संजय कोलगणे, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक हणमंत माळी यांनी डॉ. अपर्णा गुरव यांना पत्र देवून त्यांची प्रशंसा केली आहे.
जिल्हा प्रशासनातील विविध विभागांनी आपापल्या विभागांची माहिती मुदतीत दिल्याने जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन शासनाने दिलेल्या मुदतीत प्रकाशित झाले आहे. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे हे यश मिळाले आहे.
– डॉ. अपर्णा गुरव (उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय)