सादिक सय्यद
पाचगणी – महाबळेश्वर शहरातील साबणे रोडच्या सुशोभिकरणात संपूर्ण बाजारपेठेत लखलखाट करणारी नावीन्यपूर्ण विद्युत रोषणाई केद्रबिंदू ठरणार आहे. दिवसा निसर्गरम्य परिसरात फिरताना मिळणाऱ्या आनंदाप्रमाणेच रात्रीदेखील बाजारपेठेत खरेदीचा मनमुराद आनंद पर्यटकांना घेता यावा, स्ट्रॉबेरीची चव चाखता यावी, याकरिता साबणे रोडवर रात्री रोषणाईने आच्छादन बनवण्याची नावीन्यपूर्ण कल्पना राबवण्यात येणार आहे.
महाबळेश्वरच्या स्ट्राबेरीची जीभेवर रेंगाळणारी चव पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याकरीता साबणे रोडवरील 23 पैकी नऊ गल्ल्यांच्या सुशोभिकरणात जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या माध्यमातून स्ट्रॉबेरी ग्रीन व्हॅली संकल्पना दिल्ली शहराच्या धर्तीवर साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या गल्ल्यांमध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या विद्यार्थ्यांकडून विलोभनीय निसर्गचित्रे रेखाटण्यात येणार आहेत. या निसर्गचित्रांमध्ये दर दोन महिन्यांना बदल करून नवनवीन निसर्गचित्रे काढली जाणार आहेत.
रोडवरील विद्युत खांबांवर महाबळेश्वरच्या निसर्गाबाबत, विविध पॉइंटस्बाबत माहिती देणारे विद्युत रोषणाईचे आकर्षक फलक बसवण्यात येणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने महाबळेश्वरच्या सुशोभिकरणासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून साबणे रोडच्या कामाला गती येणार आहे. हे सुशोभिकरण झाल्यावर पर्यटकांच्या संख्येत 14 टक्के वाढ अपेक्षित आहे.
चौकांचे विशेष सुशोभिकरण
साबणे रोडचे सुशोभिकरण करताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशेष सुशोभिकरण, सुभाषचंद्र बोस चौकाच्या सुशोभिकरणात ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांना बसण्याकरिता आसनव्यवस्था व वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. साबणे रोडवरील सर्व दुकानांच्या फलकांचा आकार समान असेल. त्यांची लांबी व रुंदी ठरवून देण्यात येणार आहे.