वाई (प्रतिनिधी) – वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हळदीच्या लिलावाचा शुभारंभ दि. 12 रोजी दुपारी 2.30 वाजता जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी हळदीचे पीक घेतात. त्यामुळे तालुका राज्यामध्ये हळद पिकाचे आगार समजला जातो. हळदीला किती दर मिळतो, याची चिंता न करता पिढ्यान्पिढ्या हळदीचे उत्पादन घेणारे शेतकरी दिसतात. राज्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून अल्प दर मिळतो. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी नाराज होऊ नये, म्हणून वाईच्या बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने गुरुवारी हळद व्यापारी, हमाल, माथाडी अशा सर्वांची बैठक घेतली.
शेतकऱ्यांच्या हळदीला जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी व्यापाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केले. त्यामुळे या वर्षात हळद पिकाला अधिक दर मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. बाजार समिती आवारात जानेवारीपासून हळदीची आवक होऊ लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल निवडून, स्वच्छ करून, 50 किलोच्या पोत्यांमध्ये भरून विक्रीसाठी आणावा. व्यापाऱ्यांनीही चालढकल न करता हळदीचे सौदे करावेत, असे आवाहन पिसाळ यांनी केले आहे.