कोरेगाव – विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त कोरेगाव तालुक्यातील दोन गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गावातील ग्रामस्थांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वी केला जाणार आहे.
सरकारचा विकसीत भारत संकल्प यात्रा हा महत्वाचा कार्यक्रम असून, त्याची जिल्हास्तरावर जय्यत तयारी केली जात आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष बैठक घेऊन प्रशासकीय खातेप्रमुख व अधिकाऱ्यांकडून यात्रेच्या तयारीविषयक आढावा घेतला. 11 तालुक्यांमध्ये 22 गावांमध्ये विकसीत भारत संकल्प यात्रेनिमित्त कार्यक्रम होणार आहेत. कोरेगाव तालुक्यात दोन गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात 11 दिवसांचा कार्यक्रम चालणार असून, प्रत्येक दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये विविध शासकीय दाखल्यांचे वाटप, आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे लोकसहभाग वाढविण्यात येणार असून, लोकप्रतिनिधींसह महिला बचत गट, स्वयंसेवी कलापथकांना त्यामध्ये सामील केले जाणार आहे. शाळा-महाविद्यालयस्तरावर स्वच्छता स्पर्धा घेतली जाणार आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी हे विकसीत भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.