पाच जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत
पोलीस तपासातील माहिती : आठ जणांच्या कोठडीत वाढ
पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपींबाबत संवेदनशील माहिती असलेला तीन पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. या आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या काही गोष्टी तपासातून समोर आल्या आहेत.
ललित पाटील प्रकरणात आणखी चौघांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यातील दोन आरोपी इमरान शेख उर्फ अतिक खान आणि हरिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांसह अकरा जणांची पोलीस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले.
या तपासावरून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेफेड्रोन ड्रग्जची निर्मिती, साठवण, वितरण याबाबतची माहिती तपासात उघड झाली असून, त्यातील प्रत्येकाचा सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या साखळीचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली.
सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विलास पटारे यांनी बाजू मांडली. यातील ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, जिशान शेख, राहुल पंडीत ऊर्फ रोहित कुमार, इम्रान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांच्या पोलीस कोठडीत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिला. तर सुभाष मंडल, रौफ शेख, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी, प्रज्ञा कांबळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. रौफ याच्या वतीने ऍड. शिवप्रसाद साळुंके यांनी बाजू मांडली.
कोट्यवधींचे घबाड
या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत बाजार भावाप्रमाणे 2 कोटी 14 लाख 30 हजार 600 रुपये आहे. आतापर्यंत या पदार्थांच्या विक्रीतून आरोपींनी आठ किलो सोन्याची बिस्किटे, चार चाकी वाहने, महागडे मोबाइल खरेदी केलेले आहेत. ही सर्व रक्कम सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या वर आहे.