सातारा – खेड, ता. सातारा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या लता अशोक फरांदे यांनी उमेदवारी अर्जात खोटी माहिती देऊन, ग्रामपंचायत अधिनियमनाचे उल्लंघन केले आहे. त्यांचे पती अशोक फरांदे यांच्या मिळकतीतील मोबाइल टॉवरचा ग्रामपंचायत कर थकीत असतानाही, कोणतीही थकबाकी नसल्याचे लता फरांदे यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावी, अशी याचिका माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
या याचिकेत लता फरांदे, खेडचे ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेत म्हटले आहे की, लता फरांदे यांचे पती अशोक शिवाजी फरांदे यांच्या नावे ग्रामपंचायत मिळकत नं. 1697 आहे. दोघे एकत्र राहतात. लता फरांदे यांनी 2022 साली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक लढवली होती.
त्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना, त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यात ग्रामपंचायतीच्या नियमानुसार देय असलेली कोणत्याही रकमेची थकबाकी नाही, असे त्यांच्या सहीने नमूद केले आहे. मात्र, खेड ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकार्यांनी 30 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या दाखल्यात ग्रामपंचायत मिळकत नं. 1697 हे लता फरांदे यांचे पती अशोक फरांदे यांच्या नावे असल्याचे म्हटले आहे. या मिळकतीमध्ये एका कंपनीला मोबाइल टॉवरसाठी भाडेकराराने जागा देण्यात आली आहे. या मिळकतीचा 2022-23 अखेरचा ग्रामपंचायत कर येणे बाकी असल्याचा दाखला देण्यात आला आहे.
त्यावरून लता फरांदे यांनी उमेदवारी अर्जाच्या घोषणापत्रात ग्रामपंचायत कराची थकबाकी नसल्याचे खोटे नमूद केले होते, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 14(1)(ह) अन्वये अपात्र ठरतात. या तरतुदीचा विचार करून लता फरांदे यांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी मोरे यांच्यावतीने अॅड. चंद्रकांत बेबले यांनी केली आहे.