सातारा – सातारा जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
एप्रिल ते सप्टेंबर 2023 अखेर प्रलंबित इन्सेटिव्ह मिळावा, मंजूर झालेली 5 टक्के वेतनवाढ ही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून मिळावी. ज्या अधिकाऱ्यांनी करोना काळात काम केले आहे त्यांचा परफॉर्मन्स रिपोर्ट करून त्यांनाही वेतनवाढीचा लाभ मिळावा. मंजूर झालेला वेतनवाढ फरक मिळावा. समुदाय आरोग्य अधिकारी प्रामाणिकपणे आरोग्यवर्धिनी केंद्रात उत्कृष्ट सेवा रूग्णांना देत आहेत. आरोग्य विभागाने समुदाय आरोग्य अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांवर त्वरीत तोडगा काढावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळी संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता. प्रशासनाने या मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.