विद्यमान सरपंचांच्या पत्नीचा पराभव
राजगुरूनगर : सांडभोरवाडी (तिन्हेवाडी, ता. खेड) येथे सत्ता परिवर्तन झाले. विद्यमान सरपंचांना मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले. निवडीनंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
सांडभोरवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी प्रतिभा संतोष पाचारणे या 152 मतांनी निवडून आल्या त्यांनी विद्यमान सरपंच अरुण थिगळे यांच्या पत्नी मीरा अरुण थिगळे यांचा पराभव केला. राजगुरूनगर शहराच्या जवळ असलेली सांडभोरवाडीची निवडणूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती.
निवडणुकीत दोन पॅनल उभे करण्यात आले होते. पॅनल प्रमुख सरपंच तथा राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष अरुण थिगळे यांनी त्रिलोकेश्वर महादेव पॅनल उभा केला होता तर माजी सरपंच कविता पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली जानुबाई बापदेव वाघोबा महाराज पॅनल उभा केला होता. या अटीतटीच्या निवडणुकीत माजी सरपंच कविता पाचारणे याच्या नेतृत्वाखाली जानुबाई बापदेव वाघोबा महाराज पॅनलला मतदारांनी कौल दिला. 11 सदस्यांपैकी 6 सदस्य निवडून आले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व असलेली वाडी आहे. दोन्ही पॅनल त्यांच्या माध्यमातून उभे राहिले होते. कोणीही निवडून आले तरी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनाच फायदा होणार होता; मात्र स्थानिक पातळीवर मोठे राजकारण होते. यामुळे दोन पॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या.
या निवडणुकीत प्रदीप सांडभोर, विजय सांडभोर, नवनाथ वरकड, भास्कर जगदाळे, रोहिदास आरुडे, शेखर पाचारणे संतोष पाचारणे यांनी तर विरोधी पॅनल कडून माजी सरपंच अरुण थिगळे व त्यांच्या समर्थकांनी पॅनल मधील उमेदवार निवडून आणण्यास परिश्रम घेतले निकालानंतर दोंन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यात आल्या.
विजयी उमेदवार
जानुबाई बापदेव वाघोबा महाराज पॅनल : सरपंच प्रतिभा पाचारणे, विठ्ठल वरकड, रंगनाथ आरुडे,कविता आरुडे,बाळु सांडभोर,सीमा पठारे, कविता सांडभोर. त्रिलोकेश्वर महादेव पॅनल : ज्योती सांडभोर (बिनविरोध), प्रियंका ढोरै, भगवान पाचारणे प्रियंका पाचारणे, ज्ञानेश्वर आरुडे.