लोणंद – ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ व ‘माझी वसुंधरा 4’ अभियानांतर्गत लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडा बाजार व बाजारपेठेत प्लॅस्टिकबंदी उल्लंघनप्रकरणी प्लॅस्टिक जप्ती व दंडाची कारवाई करण्यात येत आहे. नगरपंचायतीने गुरुवारी एकाच दिवसात 25 हजार रुपयांचा दंड वसूल करून, 35 किलो प्लॅस्टिक जप्त केले.
‘स्वच्छ भारत’ अभियान जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतींनी ‘मिशन मोड’वर राबवावी. जिल्ह्यात कुठेही अस्वच्छता आढळल्यास यंत्रणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोणंद नगरपंचायतीने गुरुवारी केलेल्या कारवाईत अग्रवाल स्वीटस्, ममता स्वीट मार्ट, आदित्य एंटरप्रायजेस, कुर्ला टोबॅको व अरुण ट्रेडिंग कंपनी यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला. या कारवाईत 35 किलो प्लॅस्टिकही जप्त करण्यात आले.
मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, कार्यालय अधीक्षक शंकर शेळके, रोहित निंबाळकर, पोपट क्षीरसागर, बाळकृष्ण भिसे, श्रद्धा गर्जे, सदाशिव शेळके यांनी ही कारवाई केली. यावेळी घाऊक व्यापार्यांकडून प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची शपथ घेण्यात आली. शहराची स्वच्छता ठेवण्याचे काम प्रशासनाबरोबर नागरिकांचेही आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे कापडी पिशव्या वापराव्यात, असे आवाहन गायकवाड यांनी केले.