गोळेवाडी फाट्यानजिक दुचाकी अपघात; एक जण जखमी
कोरेगाव – शिखर शिंगणापूरचे माजी सरपंच अभय रामचंद्र मेनकुदळे (वय 53) यांचे आज कोरेगावजवळ अपघाती निधन झाले.
सातारा- लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोळेवाडी फाट्यानजिक रविवारी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेले मेनकुदळे खाली पडली आणि त्यानंतर तिसऱ्याच दुचाकीचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, नातवंडे, आई व वडील असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने शोक व्यक्त केला जात आहे.
सेवानिवृत्त पोलीस हवालदार सोपान शामराव राऊत व अभय मेनकुदळे हे दोघे दुचाकीवरुन शिखर शिंगणापूरहून साताऱ्याकडे निघाले होते. दुपारी चारच्या सुमारास ते गोळेवाडी फाट्यानजिक आले. त्यांच्या दुचाकीचा वेग अत्यंत कमी होता, त्याचदरम्यान पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. मोठा दणका असल्याने दोघे जण खाली पडले. धडक देणारी दुचाकी निघून गेली. मात्र, पाठीमागून आलेल्या तिसऱ्या दुचाकीचे पुढचे चाक डोक्यावरुन गेल्याने मेनकुदळे यांचा मृत्यू झाला. सोपान राऊत जखमी झाले.
अपघातानंतर जवळच्या हॉटेल्समधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावली. उपनिरीक्षक गणेश माने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मेनकुदळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
अभय मेनकुदळे माण तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत होते. माजी आमदार प्रभाकर घार्गे व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. काही काळ प्रभाकर घार्गे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी 2014- 19 या काळात पाच वर्षे सरपंचपद भूषविले.
कोरेगाव येथील प्रसिध्द किराणा व्यापारी कै. अशोक आत्माराम उंबरदंड यांचे ते जावई तसेच राजेंद्र व संजय उंबरदंड यांचे ते मेहुणे होत. त्यांचे शालेय शिक्षण कोरेगावातच झाले. उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू म्हणून त्यांची विशेष ओळख होती. या अपघातप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दुचाकींवरील चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन त्यांना अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत.