राहूल प्र. बर्गे, राजाभाऊ बर्गे यांची माहिती; नागरिकांना अपेक्षित विकासकामांना प्राधान्य
कोरेगाव (प्रतिनिधी) – कोरेगाव स्मार्ट’ आणि स्टॅंडर्ड’ शहर करण्याचे आ. महेश शिंदे यांचे स्वप्न आहे. श्री श्री नगरमध्ये लोकसंख्या हा निकष न लावता, जनसेवा म्हणून लाखो रुपये खर्चाचा ट्रिमिक्स कॉंक्रिट रस्ता केला जात आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे व माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
श्री श्री नगरमध्ये रस्त्यावाचून नागरिकांचे होणारे हाल लक्षात आल्यानंतर आ. महेश शिंदे यांनी तात्काळ रस्त्याचे काम हाती घेतले. नागरिकांची अनेक वर्षांची मागणी काही दिवसांत पूर्ण होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पोकळ आश्वासने न देता, नागरिकांना विश्वासात घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काळी माती असलेल्या या परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रस्ता केला जात आहे.
जमिनीपासून रस्ता उंच असल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही. हा रस्ता खचणार नाही, असे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले. दीर्घकालीन विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भुयारी गटार योजना आणि ट्रिमिक्स कॉंक्रिट रस्ते केले जात आहेत. क्वालिटी कंट्रोलर म्हणून जनता काम करत असल्याने शहरात कुठेही अडचणी आल्या नाहीत, असे राहुल प्र. बर्गे यांनी सांगितले.
शहराचा रोड मॅप आ. शिंदे यांच्यासमोर असून, मोठ्या शहरांच्या धर्तीवर कोरेगावच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. सर्व 17 प्रभागांमध्ये ठोस विकासकामे प्रस्तावित आहेत. त्यापैकी काही सुरू झाली आहेत, असे राजाभाऊ बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले.
‘ते’ आले, त्यांनी पाहिले अन् काम सुरू झाले
आ. महेश शिंदे हे विकासाबाबत जागरूक आहेत. शहराच्या प्रत्येक भागाची माहिती त्यांना आहे. श्री श्री नगराला भेट दिली, तेव्हाच त्यांना रस्त्याची गरज जाणवली. त्यांनी तात्काळ ट्रिमिक्स कॉंक्रिटचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. ते आले, त्यांनी पाहिले अन् तात्काळ काम सुरू झाले, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. असे फक्त कोरेगाव मतदारसंघातच पाहायला मिळते. आ. महेश शिंदे हे विकासपुरुष आहेत, असे राजाभाऊ बर्गे म्हणाले.