उडी मारल्याने दोघे वाचले, चालक जखमी
खंडाळा – पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा येथील खंबाटकी घाटात मालवाहतुकीचा ट्रक दरीत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, अपघातावेळी ट्रकमधील दोघांनी प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतल्याने जीव वाचला. मात्र यात चालक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी पुण्याहून सातारच्या दिशेस जाणारा ट्रक (क्र. टी. बी. 2 डी. एफ. 9351) हा खंबाटकी घाटातील तीव्र चढावर अचानक थांबला व वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागे उतार असल्यामुळे माघारी येत सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला.
यावेळी ट्रकमधील चालक व त्याच्या साथीदाराने जीव वाचवण्यासाठी उडी मारली मात्र चालक गुर्ला वर्जित सिंग (वय 27, रा. अमृतसर, राज्य पंजाब) हा गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, पोलीस अंमलदार प्रकाश फरांदे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमी चालकाला खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.