तीन कर्जदारांच्या खात्यातून ४५ लाख वर्ग : नगर अर्बन बँक प्रकरण
नगर – नगर अर्बन बँकेचा माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (वय ७२ रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) याची पत्नी व नगर अर्बन बँकेचे कर्जदार यांनी एकत्रित मिळून एक कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या खात्यात तीन कर्जदारांच्या खात्यातून प्रत्येकी १५ लाख रूपये याप्रमाणे ४५ लाख रूपये वर्ग करण्यात आले व ते रोख स्वरूपात काढण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. दरम्यान, न्यायालयाने कटारिया याच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (दि. ५) वाढ केली आहे.
नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून त्यांनी माजी अध्यक्ष कटारिया याला अटक केली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी (दि. 3) संपल्याने त्याला तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी न्यायालयात हजर केले होते. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला.
जुलै २०१८ मध्ये नगर अर्बन बँकेच्या तीन कर्जदारांच्या बँक खात्यातून प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ४५ लाख रूपये माजी अध्यक्ष कटारिया याच्या पत्नी व कर्जदार यांच्या नावे असलेल्या कंपनीच्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा व्यवहार संशयास्पद असून, याबाबत तपास करणे आवश्यक आहे. सदर कंपनीच्या कागदपत्रांची संशयित आरोपीकडे मागणी करून देखील दिलेले नाही ते हस्तगत करून तपास करणे आवश्यक आहे.
याशिवाय कटारिया याने पदावर असताना कर्जदारांची कुवत नसताना कर्जाकरिता तारण मालमत्तेचे बनावट, तसेच वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कमालमर्यादेचे कर्ज मंजूर केले आहे. त्या बदल्यात संशयित आरोपीला काय मोबदला मिळाला, याबाबत तपास करायचा आहे. संशयित आरोपींनी स्वतःच्या, नातेवाईक आणि मित्रांच्या नावे काही मालमत्ता खरेदी केल्या असण्याची शक्यता आहे. याचा तपास करायचा असल्याने वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने कटारियाच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.