शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त कलाविष्कार
सातारा : जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या साहित्यिक डॉक्टर विश्वास मेहेंदळे नगरीत रविवारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी राज्याच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात उत्स्फूर्त कलाविष्कार पाहायला मिळाले. यामध्ये 19 शाळांनीभाग घेतला होता. उत्कृष्ट नेपथ्य आणि तालबद्ध पदन्यासाने विद्यार्थ्यांनी रसिक प्रेक्षकांना थिरकायला लावले.
ग्रंथ महोत्सवात रविवारच्या सुट्टीमुळे गर्दी दिसून आली. यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर सकाळी 9 पासून सातारा शहर आणि परिसरातील सुमारे 19 शाळांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
यामध्ये गजी नृत्य, गरजा क्रांतीचा जयजयकार, भलरी यासह वासुदेवसुद्धा मंचावर अवतरला. या कलाविष्कारांना रसिकांनी मनापासून दाद दिली. ग्रंथ महोत्सव समन्वय समितीच्या प्रमुख सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले.
संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस उपाध्यक्ष, विनायक लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे उपस्थित होते. नृत्य सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे जाणवले.