सातारा – कातरखटाव, ता. खटाव ग्रामस्थांनी केलेला पाठपुरावा, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे कात्रेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून दोन कोटी 23 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गावातील हेमाडपंथी मंदिराचे रूपडे यामुळे पालटणार आहे.
आ. जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील कातरखटाव येथे कात्रेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. येथे महादेवाची मोठी यात्रा दरवर्षी भरते. या मंदिराची पडझड झाल्याने जीर्णोद्धार करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी आ. गोरे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. आ. गोरे यांनी पालकमंत्री देसाई यांना पत्र देऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधीची मागणी केली होती.
पुणे येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालकांचे पत्र, नियोजन विभाग आणि पर्यटन विभागाकडील शासन निर्णयानुसार 10 नोव्हेंबर रोजी दोन कोटी 23 लाख आठ हजारांच्या निधीला तांत्रिक मान्यता देण्यात आली. दि. 21 रोजी निधीला अं तिम मान्यता मिळाल्याने कातरखटावकरांनी आनंदोत्सव साजरा केला.