खेड शिवापूर,(वार्ताहर)– मी सकाळपासूनच कल्याण, कोंढणपूर, रहाटवडे, आर्वी या गावांमधून विकासकामांचे भूमिपूजन करून आलो, मात्र या गावामध्ये मला विकास कामासाठी निधी द्या, असा उल्लेखही केला नाही. मात्र शिवापूरच्या सरपंचांनी आम्हाला गावाच्या विकास कामांसाठी भरीव निधी द्या, अशी मागणी केली, त्यामुळे ‘सरपंच कसा असावा तर असा असावा’, कारण गावाच्या विकासासाठी निधी मागणारा सरपंच हवा, असे मत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.
शिवगंगा खोऱ्यातील हवेलीच्या पश्चिम पट्ट्याच्या गावांमध्ये सुमारे एकवीस कोटी रुपयांच्या निधी विकासकामांसाठी दिला होता. त्याचे भूमिपूजन आमदार तापकीर व पीएमआरडीएचे संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी नगरसेवक धीरज घाटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष (दक्षिण) दीपक रजपूत, महिला अध्यक्षा (पश्चिम विभाग) दीपाली वाव्हळ, सरपंच आण्णा दिघे, स्वप्नील जगताप, राजेश डिंबळे, उपसरपंच राजू सट्टे, उमेश दिघे, चंद्रकांत हावलदार, अविनाश हावलदार, ओमकार हावलदार, राजेंद्र दिघे, अजय पुरंदरे, निवृत्ती वाव्हळ, सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.
ते म्हणाले की, शिवापूर गावासह अन्य गावांमध्ये विकासकामांसाठी निधी देण्यात आला आहे. जे मागितले ते आम्ही दिले. यापुढेही देत राहू. रमेश कोंडे म्हणाले की, गुंजवणी धरण प्रकल्प लवकरच पूर्ण होत आहे. त्या माध्यमातून अवघ्या शिवगंगा खोऱ्याला पाण्याचा मोठा फायदा होईल. याचे श्रेय सुद्धा आमदार तापकीर यांनाच आहे, असे मी म्हणेन. पूर्वीप्रमाणेच किंवा त्यापेक्षा जास्त पाठिंबा यावेळी मतदानरुपी माध्यमातून पाण्याची ग्वाही देण्यात आली. शिवापूरचे सरपंच आण्णा दिघे व भागातील इतर सरपंचांनी आम्ही कायम तुमच्यासोबत असून मतदानातून ते दाखवून देऊ, असा शब्द दिला.