पिंपरी – स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे पिंपरी चिंचवड जलमय झाले असून रस्ते, दुकाने, स्मशानभूमी आणि सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये देखील पाणी जमा झाले आहे. दापोडी येथील रेल्वे रुळाखालील मोरी खचली आहे. तर, शहरातील जलपर्णी हॅरिस ब्रिज येथे येऊन अडकल्याने पाणी आसपासच्या वस्त्यांमध्ये शिरले.
पिंपरी चिंचवड शहरात पावसाची संततधार सुरू असून काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साठले आहे. पहिल्याच पावसात महापालिकेने केलेल्या मॉन्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पडले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली काही महिन्यांपूर्वी शहरात ठिकठिकाणचे रस्ते, सुशोभीकरण करण्यात आले आहे. तो सर्व खर्च पहिल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साठले असून त्यातून वाट काढताना वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे. गुडघाभर पाणी किंवा खड्डे अशी रस्त्यांची स्थिती झाली आहे. चिंचवडमध्ये रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून जाताना वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडत आहेत.
स्मशानभूमी, सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी शहरातील बिजलीनगर, चिंचवड, रावेत, फुगेवाडी, दापोडी येथील अनेक सोसायट्यांच्या पार्किंमध्ये पाणी शरले आहे. सोसायट्यांमध्ये पार्क केलेली वाहने काढताना रहिवाशांची कसरत होत होती. तसेच चिंचवड परिसरातील काही दुकानांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे ते काढण्याची कसरत दुकानदारांना करावी लागत होती. पाण्याचा अंदाज येताच त्यांनी आपले साहित्य वरती ठेवण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे नवी सांगवी येथील कृष्णा चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नुकतेच या ठिकाणी रस्ते आणि ड्रेनेजचे काम करण्यात आले होते. परंतु नियोजनशून्य पद्धतीने केलेल्या या कामामुळे रस्त्यावरील पाणी कमी करण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांना मोठी कसरत करावी लागली. मुसळधार पावसामुळे फुगेवाडी येथील स्मशानभूमी पूर्ण पाण्याखाली गेली आहे.
शेतांमध्ये साचले तळे
पिंपरी चिंचवड शहरातील उपनगरांतील काही भागांमध्ये आजही शेती केली जाते. रावेत, मोशी, पिंपळे गुरव, किवळे परिसरात शेतकरी शेतात पिक घेतात. या शेतांमध्ये संततधार पावसामुळे तळे साचले आहे. काहींवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे.
रस्त्यावर झाडांच्या फांद्या
पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या आहेत. रावेत येथील एका पेट्रोल पंपासमोर वळणावर झाडाच्या फांद्या पासामुळे तुटून पडलेल्या आहेत. त्याचा रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्या उचलण्याऐवजी वाल्हेकरवाडी येथील डिव्हायडरधझील रोपांची छाटणी सुरू होती.
रेल्वे रुळाखालीलमोरी खचली
सतत सुरू असलेल्या पावसामुळे फुगेवाडी परिसरात पोल क्रमांक 172/17 येथील रेल्वे रूळाखालची मोरी खचली आहे. पाण्याच्या लोंढ्यामुळे रेल्वे मोरीवरील भराव खचला आहे. भराव खचल्याने त्याची माती मोरीच्या जवळच पडली आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे हा मार्ग व परिसर धोकादायक झाला आहे.
मोरया गोसावी मंदिरात पाणी
चिंचवड गावातील महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात पाणी शिरले आहे. दोन दिवसांपूर्वी या मंदिर परिसरात पाणी शिरले होते. बुधवारी (दि. 13) निम्म्यापेक्षा अधिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तर, नागरिक पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तसेच नदीपात्रात श्रीफळ अर्पण करत आहेत.
==============