लाहोर – पाकिस्तानमधील कोट लखपत तुरुंगात हत्या झालेले भारतीय नागरिक सरबजीत सिंग यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अज्ञात बंदुकधार् यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला आहे.
आमिर तांबा असे या आरोपीचे नाव असून लाहोर शहरातील इस्लामपुरा भागात त्याच्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे. तांबा याला रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तो मरण पावल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसराची नाकाबंदी केली असून मारेकर् यांचा शोध सुरू करण्यात आला आहे, असे स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे. सरबजीत सिंग हे भारतातील पंजाब प्रांतातल्या भिकविंड गावातले शेतकरी होते.
भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सीमेजवळच ते रहात असत. मद्याच्या अमलाखाली चुकून ते सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पोचले होते. मात्र पाकिस्तानातील न्यायालयाने १९९१ मध्ये त्यांना घुसखोरीच्या आरोपात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.
लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात त्यांना २२ वर्षे ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान २०१३ साली तुरुंगातील अन्य कैद्यांनी तुरुंगाच्या आवारातच त्यांना बेदम मारहाण केली होती. यादरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. या दुखापतीमुळे सरबजीत यांचा मृत्यू झाला होता.
लाहोरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या हल्ला प्रकरणातील आरोपी तांबा आणि सहआरोपी मुदस्सर यांना २०१८ साली सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले होते. ठोस पुराव्या अभावी न्यायालयाने या दोघांची निर्दोष मुक्तता केली होती. यादोघांपैकी तांबा याची आज अज्ञात बंदुकधार् यांनी गोळ्या घालून हत्या केली.