खालापूर, (वार्ताहर) – मावळ लोकसभेवर पुन्हा भगवा फडकाविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदार संघाकरिता संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार आहे.
सोमवारी (दि. 4) उद्धव ठाकरे यांनी पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी सभा घेतल्या. सुरुवातीला हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे उद्घाटन केल्यानंतर पनवेल येथे सभा घेण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांची उमेदवारी घोषित करून मावळ मतदार संघावर पुन्हा भगवा फडकविण्याचे आवाहन केले.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. गेली १५ वर्ष शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. आता शिवसेनेचे दोन भागात विभागणी गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मावळ लोकसभेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करत कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.