मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमीच शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधतात. यावेळी देखील पत्रकार परिषदेत त्यांना शिंदे गटावर टीका केली.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच संजय राऊत आक्रमक झाले. यावेळी संजय राऊत थेट ऑन कॅमेरा थुंकले. या कृत्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत आहे. या वादानंतर संजय राऊतांनी जीभेचा त्रास असल्याचं सांगत त्यावर स्पष्टीकरणही दिलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संजय राऊत यांच्या प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, “हे काही राष्ट्राचे, राज्याचे प्रश्न नाहीत. मी त्यावर भाष्यदेखील करू इच्छित नाही आणि त्याला महत्त्वही देऊ इच्छित नाही.’ असेही ते म्हणाले
तत्पूर्वी, श्रीकांत शिंदे यांनी ‘उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील’ अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर असे कोण म्हणाले, असे संजय राऊत यांनी विचारले. त्यावर पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतले. श्रीकांत शिंदेंचे नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले. संजय राऊत यांच्या या कृतीनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, “शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची औपचारिक भेट होती. त्यांच्या संस्थेचा सोहळा आहे म्हणून आमंत्रण देण्यासाठी ते गेले होते. प्रमुख नेता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला निमंत्रण देण्यासाठी गेला असेल तर, त्यात राजकारण काय असू शकते. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत.”