मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काल सोमवारी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. काल तब्बल १० तास त्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर आजही त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यावरुनच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजप वर टीका केली आहे. ही हुकूमशाही नसून झोटिंगशाही असल्याची टीका त्यांनी केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे. त्यानिमित्ताने राऊत अयोध्येत कालपासून आहेत.
ही एक प्रकारची झोटिंगशाही
राहुल गांधी यांच्या ED चौकशी वरून संजय राऊत म्हणाले , काँग्रेसच कशाला? समाजवादी पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूलसह जे भाजपसोबत नाही त्यांना बडगा दाखवण्याचे काम सुरू आहे. याला राज्य करणे म्हणत नाही. ही एक प्रकारची झोटिंगशाही आहे. ही हुकूमशाही नाही. ही झोटिंगशाही आहे. झोटिंगशाही ही हुकूमशाहीच्या पुढची पायरी आहे, असं संजय राऊत म्हणाले. विरोधकांची एकजूट असो नको, विरोधकांना त्रासा दिला जात आहे. तपास यंत्रणाचा वार करून फूट पाडली जात आहे. बहुमत मिळवलं जात आहे असे ते म्हणाले.
आता उठसूट टीका …
पुढे बोलताना राऊत म्हणाले , ज्या पद्धतीने सुरक्षा यंत्रणांचा वापर सुरु आहे. ते पाहता राजकीय विरोधकांना चिरडू शकतो हे दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे देशातील वातावरण दुषित झाले आहे. विरोधकांशीही अदबीनंव वागावं ही आपली संस्कृती. नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंत ही संस्कृती पाळली गेली. आज राजकारणातील सहिष्णूता नष्ट केली आहे. जाती जातीत द्वेष, धर्माधर्मात द्वेष पेरला जात आहे. राज्यकारभार सूडाने केला जात आहे. राजकीय विरोधक कुणाला म्हणायचं? राजकीय विरोधकांना पूर्वी प्रतिष्ठा आणि लायकी होती. आता ऊठसूट टीका केली जाते. सोडून द्या, असंही ते म्हणाले.