पिंपरी (प्रतिनिधी) – माजी नगरसेवकांनी सांगितलेली कामे होतात. मात्र आम्ही सांगितलेली कामे होत नाहीत. वार्डात तोंड बघून कामे सुरू आहेत, असा आरोप नागरिकांनी सोमवारी (दि.13) ब क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत केला. सोमवारी झालेल्या क्षेत्रीय जनसंवाद सभेस शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी दहा नागरिकांनी आपली परिसरातील समस्या मांडल्या.
किवळे परिसरात अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. याबाबत वांरवार तक्रार मांडूनही काम होत नाही. केवळ तक्रारींना उत्तर देण्याचे काम प्रशासन करीत आहे. माजी नगरसेवकांनी सांगितलेली कामे होतात. आम्ही सांगितलेली कामे होत नाहीत. केवळ तोंड बघून अधिकारी काम करतात, असा आरोप नागरिकांनी जनसंवाद सभेत केला.
काळेवाडी परिसरात कंपन्यांना जारमधून पाणी पुरवठा करणाऱ्या चार कंपन्या आहेत. त्या महापालिकेच्या जलवाहिनीतून चोरून पाणी घेतात. याबाबत सामाजिक कार्यकर्ते गेल्या अनेक जनसंवाद सभेत तक्रार करीत आहेत. मात्र अद्यापही या अनधिकृत नळजोडांवर महापालिकेने कारवाई केलेली नाही. आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.
वाल्हेकरवाडी आणि काळेवाडी परिसरातील ड्रेनेज लाइन वारंवार चोकअप होत असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या. वाल्हेकरवाडी येथील ड्रेनेजलाइन पावसाळ्यानंतर बदलण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच काळेवाडी परिसरात ड्रेनेजचे झाकण रस्त्यापेक्षा उंच झाल्याने या ठिकाणी अपघात होतात, याकडेही नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. काळेवाडी परिसरात अद्यापही माजी नगरसेवकांचे नामफलक काढले नसल्याचेही नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.