Sanjay Raut on BJP। केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह दिलंय. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्यातच आज या चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलंय.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी,“महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला अत्यंत चांगलं आणि ऐतिहासिक चिन्ह मिळालंय. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच उत्साहाचं वातावरण होतं”,असे त्यानी म्हटले.
कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा Sanjay Raut on BJP।
पुढे बोलताना “भाजपाने अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवला आहे की तुमचे उमेदवार कमळावर लढतील. धनुष्यबाण मिळालं असलं तरीही लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. घड्याळ जरी दिलं असलं तरीही तुम्हाला लोक मतदान करणार नाही. त्यामुळे तुम्ही कमळावर लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे. पी. नड्डा यांनी दिला आहे, हे जर खोटं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं”, असे थेट आव्हान संजय राऊतांनी अजित पवार गट आणि शिंदे गटाला दिलं.
त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल Sanjay Raut on BJP।
“ज्या दोन गटांनी चिन्ह चोरलं त्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढण्याची हिंमत नाही. भाजपालासुद्धा हे फुटलेले दोन गटांना त्यांच्या निवडणूक चिन्हावर निवडवणूक लढवण्याचं धाडस नाहीय. या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही मशाल चिन्ह घेऊन लढेल आणि शरद पवारांचा पक्ष तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात आहेच. त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.