बुलेट ट्रेन दिली म्हणून ‘त्यांना’ पद्म पुरस्कार;संजय राऊतांची सरकारवर खोचक टीका

मुंबई: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केलेल्या पुरस्कारावरून आता शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली आहे. पद्म पुरस्कारावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचे मी स्वागत करतो, असे म्हटले. तसेच बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचं मी स्वागत करतो, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. इतकं मोठं राज्य आहे. त्यात इतके लोक काम करतात. पण महाराष्ट्रातील केवळ 6 लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे. इतर राज्यातील नावं पाहिली आहे. राज्यातील 10 ते 12 लोकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यता येतो. यंदा फक्त सहाच जणांना पुरस्कार देता? ही नावं पाहून मला आश्चर्य वाटले, असे राऊत म्हणाले.

ज्या सहा लोकांना पुरस्कार देण्यात आले. त्यांची नावं राज्य सरकारच्या यादीत होती की नाही, हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले. राज्य सरकारकडून काही नावांची शिफारस केली जाते. मला वाटतं त्यातलं एकही नाव पुरस्कार मिळालेल्यांमध्ये नसेल, असंही ते म्हणाले. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार दिल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले. त्यावर बुलेट ट्रेन दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असावा. महाराष्ट्राने जी बुलेट ट्रेन नाकारली, त्यासाठीच हा पुरस्कार असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचंही नाव होतं. ‘सिरम’चे अदर पूनावाला, दिग्गज अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सुबोध भावे यांचीही नावं पाठवली होती. मात्र केंद्राने केवळ एकाच व्यक्तीची निवड केली असून इतर 97 जणांना प्रतीक्षेत राहावे लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.