मुंबई – अभिनेता संजय दत्तचा खलनायक हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल झाला आहे. आज 5 सप्टेंबर रोजी हा चित्रपट पुन्हा रिलीज केला आहे. सुभाष घई यांनी या चित्रपटाचा दुसरा भागही बनवण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले आहे. चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली. चित्रपटाच्या कलाकारांनी पुन्हा रिलीज होण्यापूर्वी एक सेलिब्रेशन केले. यावेळी संजय दत्त, सुभाष घई, जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटाशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला.
खलनायक पुन्हा रिलीज झाल्यावर, सुभाष घई यांनी अलका याज्ञिक आणि इला अरुण यांच्यासह मुख्य कलाकारांसह स्क्रीनिंग आयोजित केले. यादरम्यान संजय दत्तने सुभाष घई यांनी ‘चोली के पीछे गाण्याच्या शूटिंगवेळी घागरा-चोली कशी घालायला लावली आणि या गाण्याच्या शूटिंगवेळीचा किस्सा सांगितला. खलनायक मधील ‘चोली के पीचे’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. चित्रपटात एक मेल वर्जन देखील होते ज्यामध्ये संजय दत्तने डान्स केला आहे.
संजय दत्त म्हणाला, मी खलनायच्या भूमिकेत सेटवर आलो होतो. सुभाषजी म्हणाले, याला घागरा चोली घालायला लाव. मला धक्काच बसला, मी म्हणालो, सर काय करताय? तेव्हा ते म्हणाले, हो घागरा आणि चोली घालून ये.. कारण तू अभिनेत्रींच्या मागे असणार आहे. हे गाणे शूट करतांना अनेक किस्से घडले ते सर्व यावेळी संजय दत्तने सांगितले.
दरम्यान, सुभाष घई यांनी यापूर्वी सांगितले होते की, ‘गदर 2’च्या यशानंतर अनेक लोक त्यांना ‘खलनायक’चा सिक्वेल आणण्यास सांगत आहेत. त्यामुळे मी लवकरच घोषणा करणार आहे. संजय दत्त मुख्य भूमिकेत असणार असून त्याच्यासोबत एका नवीन अभिनेत्याला घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.