सांगली – सांगलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार विक्रम सावंत यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. सावंत यांनी काँग्रेसचे इच्छुक बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता. पण आता त्यांनीच राऊत यांची भेट घेतल्यामुळे सांगलीच्या उमेदवारीच्या मुद्यावरून काँग्रेस व ठाकरे गटात सुरू असलेला वाद संपल्याची चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटली आहे. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी येथून अपक्ष उमेदवारी दाखल करून आपले मनसुबे दाखवून दिलेत. त्यातच त्यांच्यासाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम व जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी आपली ताकद पणाला लावल्यामुळे महाविकास आघाडीत एकच हल्लकल्लोळ माजला होता. पण आता येथील वातावरण निवळल्याची चिन्हे आहेत.
चंद्रहार पाटील आज भरणार अर्ज
ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यासाठी खासदार संजय राऊत शुक्रवारी सांगलीला पोहोचले होते. ते येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळई महाविकास आघाडीचे स्थानिक नेतेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
या भेटीमुळे स्थानिक पातळीवर मविआत निर्माण झालेले मतभेद संपुष्टात आल्याचा दावा केला जात आहे. या घटनाक्रमामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटलांच्या अडचणींत भर पडली आहे. यामुळे त्यांचे मताधिक्य घटण्याची भिती आहे.