Sangamner Bajar Samiti Election Result – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ व जनसेवा विकास मंडळ अशी लढत झाली. बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली होती. अखेर थोरात-विखे अशी लढत झाली, तर या निवडणुकीत 9 अपक्षांनी नशीब अजमावले. आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ विरुद्ध महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा विकास मंडळ अशी चुरशीची लढत झाली. मात्र, पुन्हा एकदा आ. थोरात यांची एकहाती सत्ता आली आहे.
शुक्रवारी संगमनेर बाजार समितीच्या विविध मतदारसंघातील 18 जागांसाठी 97.12 टक्के मतदान झाले. सकाळी दहाच्या सुमारास आलेल्या पहिल्या निकालातूनच या निवडणुकीत आ. थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व राहिले.
पहिल्या फेरीत थोरात गटाची आघाडी पाहायला मिळाली. पहिल्याच फेरीत 4 जण विजयी होत आ. थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने खाते उघडले. दुसऱ्या फेरीत 3 जागा विजयी झाल्या. या वेळी महविकास आघाडीचे पारडे जड होताना दिसून आले. या वेळी विखे-थोरातांच्या लढतीत अपक्षाने बाजी मारली.
दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव करत हमाल मापाडी संघात अपक्ष उमेदवार सचिन कर्पे विजयी झाले. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. तिसऱ्या फेरीतही थोरातांच्या महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले. 18 पैकी 11 जागांचा निकाल जाहीर होत अद्यापही विखे गटाला एकही जागा न मिळाल्याने निकाल एकतर्फी असल्याचे जाहीर होऊ लागले होते.
शेवटच्या फेरीअंती थोरात यांच्या कपबशीसमोर विखे यांचे विमान कोसळल्याचे पाहायला मिळाले आणि शेवटी संगमनेर बाजार समितीवर थोरातांचीच सत्ता कायम असल्याचे स्पष्ट झाले.
सोसायटी मतदारसंघातून विद्यमान सभापती शंकरराव खेमनर, सुरेश कान्हेरे, सतीश खताळ, गीताराम गायकवाड, मनीष गोपाळे, कैलास पानसरे, विजय सातपुते निवडून आले. महिला राखीव मतदारसंघातून दीपाली वरपे व रुक्मिणी साकोरे विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून सुधाकर ताजने, तर भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून अनिल घुगे विजयी झाले आहेत. व्यापारी मतदारसंघातून मनसुख भंडारी व निसार शेख मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. ग्रामपंचायत मतदारसंघातून अरुण वाघ, सखाहारी शरमाळे, संजय खरात, नीलेश कडलग विजयी झाले आहेत. मैत्रीपूर्ण लढत झालेल्या हमाल मापाडी मतदारसंघातून सचिन करपे विजयी झाले आहेत.
आ. थोरातांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब! | Sangamner Bajar Samiti Election Result
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच विखे पाटलांनी आपल्या जनसेवा मंडळाचा संपूर्ण पॅनलच मैदानात उतरविल्याने यंदाच्या निवडणुकीतील रंगत वाढल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मात्र, मतदारांनी संगमनेरातील सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. थोरातांचे नेतृत्त्वच कायम असल्याचे दाखवून दिले आहे.