तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकरचा “सांड की आंख’ हा सिनेमा राजस्थानमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महिला सबलीकरण व खेळावर आधारित फिल्म ‘सांड की आँखें’ ला राज्यातील “एसजीएसटी’तून सवलत देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
या सिनेमात ग्रामीण भागातील दोन महिलांच्या धाडसी कर्तृत्वाचे दर्शन घडवले गेले आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील दोन वृद्ध महिला नेमबाजी शिकतात आणि गावातील बालिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. एवढेच नव्हे तर या क्रीडाप्रकारामध्ये महिलांनी सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रेरणाही देतात.
तापसी आणि भूमी या दोघींना प्रथमच वयाची 80 वर्षे ओलांडलेल्या वृद्ध महिलांच्या भूमिका साकाराव्या लागल्या आहेत. “सांड की आंख’ अर्थात “बुल्स आय’ मधून नेमबाजीच्या कौशल्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. नायक प्रधान एन्टरटेनमेंट फिल्मपेक्षा नायिका प्रधान म्हणूनही या सिनेमाचे महत्व अधिक आहे.
या दिवाळीमध्ये “सांड की आंख’ रिलीज होणार आहे. राजस्थान सरकारने यापूर्वी हृतिक रोशनचा “सुपर 30′ आणि अक्षय कुमारच्या “पॅडमॅन’ सारख्या सिनेमांनाही करमुक्त केले होते.