कलंदर: लगबग…

उत्तम पिंगळे

विजयादशमीची धामधूम वरुणराजाच्या शिडकाव्यात झाली. आता तर खरे वेध दिवाळीचे असे सामान्य माणूस म्हणतो. पण सामान्यांमध्येही राजकारण एवढे घुसले आहे की हळूहळू सणवार जरा बाजूला पडत आहेत. सामान्य माणसांचा विचार केल्यास दिवाळी आली म्हणजे नोकरदारांना बोनसचे वेध. मग त्यात निमसरकारी आस्थापनांमध्ये किंवा पालिकांमध्ये बोनससाठी नेहमीचे संपाचे हत्यार मग चर्चा गुऱ्हाळ आणि शेवटी काहीतरी तोडगा. एकंदरीत नोकरदार व खासगी काम करणारे आपली पै पै साठवून दिवाळीसाठी तजवीज करत असतात. काही मोठ्या सरकारी व खासगी कंपन्यांच्या नोकरदारांना म्हणजे मध्यम वर्गाला बोनस मिळतो पण तेथे ही टक्‍केवारीसाठी आंदोलने होतात, असे झाले हे नेहमीच्या दिवाळीचे.

पण या वेळी राजकीय धुमश्‍चक्री एवढी होणार आहे की त्यात राजकारण्यांना दिवाळी राहू दे बाजूला, जसे आधी लगीन कोंडाण्याचे तसे आधी लगीन निवडणुकीचे मग दिवाळीचे पाहू. बरं राजकारण्यांबरोबर त्यांच्या नोकरशहांचीही तीच अवस्था आहे. आता तर सर्वच पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांनीही कसून कामाला सुरुवात केली आहे कारण या निवडणुकीस दिवाळीआधी सामोरे जायचे आहे. आता हे सर्व नेत्यांचे व उमेदवारांचे झाले पण त्यांचे पुलंच्या नारायणासारखे असणारे कार्यकर्ते आधीच गांगरून गेले आहेत. निवडणूक त्यांच्या अंगात भिनू लागली आहे. मग अगदी दसराही साजरे करण्यात राजकीय रंग दाखवून गेले. आता उद्या तर कोजागिरी पौर्णिमा आहे तर अशा वेळी आपल्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा याचाच ते विचार करत आहेत.

नवरात्रीतील राजकीय पोस्टरबाजी आपण सर्वत्र पाहिली असेलच. सर्वच ठिकाणी आता निवडणुकांचे वारे वाहू लागले असून त्यात दिवाळी झाकोळली जाणार आहे. कारण एकदा निकाल लागला की राजकीय नेत्यांचे एकीकडे दिवाळी तर दुसरीकडे दिवाळे वाजणार आहे. कारण बहुमताचे सरकार येणे व सरकारच्या बाजूने निवडणूक जिंकणे ही एक गोष्ट, सरकार नसणे व निवडणूक विरोधी गटात जाऊन जिंकणे ही दुसरी बाजू. आपल्या पक्षाचे सरकार येणे पण आपण पडणे ही तिसरी बाजू तर आपले सरकारही न येणे व आपणही पडणे ही चौथी बाजू असे चित्र दिसणार आहे. कुणा कार्यकर्त्याकडे बहीण वा मुलींचा दिवाळसण असेल पण त्या कार्यकर्त्याला आता वेळ कुठे आहे? कारण निवडणूक त्याच्या अंगात भिनली आहे.

कुणाला दिवाळीमध्ये सासुरवाडीत जायचे आहे पण त्याची तयारी बाजूला राहिली, आधी निवडणूक. कित्येक कार्यकर्त्यांची मुले बाळे दिवाळीसाठी काही खास हट्ट करत असतील पण तो ऐकण्यासाठी तरी त्यांच्याकडे वेळ कुठे आहे? त्यातल्यात्यात मोठ्या नेत्यापाशी कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा असतो मग त्यातीलच काही निवडक लोकांना आपल्या घरी दिवाळीच्या कामात गुंतवणे हे ओघानेच आले मग अशावेळी तो कार्यकर्ताही आपल्या घरच्या दिवाळीची गुपचूप तयारी करून टाकतो.

देशामध्ये अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडत आहे. पुराने केलेले शेतीवाडीचे नुकसान व औद्योगिक मंदीची चाहूल असे देशाचे चित्र आहे. अशावेळी महाराष्ट्र व हरियाणामधील कार्यकर्त्यांमध्ये सध्या निवडणुकीचे भूत संचारले आहे. त्यामुळे दिवाळीपेक्षा अधिक लगबग निवडणुकीची दिसत आहे. अगदी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीही सर्वच नेते पोस्टरबाजीला सुरुवात करत आहे जेणेकरून आपली छबी मतदारराजाला दिसावी. अशा वेळी “दिवाळी कम’ पण “निवडणूक जादा’ अशी लगबग सर्वत्र दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.