मुंबई – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबत केलेल्या कथित चॅट समोर आल्या आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 8 जून रोजी निश्चित करत अटकेपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले आहे.
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेवर गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी न्या. अभय आहुजा आणि न्या. एम. एम. साठये यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी पार पडली. क्रूझमध्ये ड्रग्जचा समावेश असलेल्या आर्यन खान प्रकरणात मुंबई न्यायालयाने सीबीआयला 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जून रोजी असून तोपर्यंत न्यायालयाने समीर वानखेडेला अंतरिम दिलासा दिला आहे.
दस्तऐवज सार्वजनिक करू नये
याआधी समीर वानखेडे यांनी चॅट जोडले होते, तेव्हा न्यायालयाने याचिकाकर्ते एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांना सांगितले होते की, या काळात समीर वानखेडे मीडियाशी बोलू शकत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे शेअर करू शकत नाहीत.
प्रसारमाध्यमांसह किंवा कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करू शकत नाही. सीबीआय जेव्हा समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावेल तेव्हा त्यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागेल, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.