नवी दिल्ली ( Sameer Wankhede ) – अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दल विशेष चौकशी समितीने अनेक खुलासे केले आहेत. तसेच पदाचा गैरवापर केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
ही समिती एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आली आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वानखेडेंविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपासादरम्यान समितीचा अहवाल आला आहे. या अहवालात वानखेडेंविरोधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. ( Sameer Wankhede )
समीर वानखेडे यांनी 2017 ते 2021 दरम्यान सहा परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचा समावेश आहे. या परदेश दौऱ्यांसाठी समीर वानखेडे यांनी 8.75 लाखांचा खर्च दाखवला आहे, जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी आहे.
लंडनच्या 19 दिवसांच्या सहलीसाठी, वानखेडे यांनी एक लाखांचाच खर्च दाखवला होता. तर, तिथे ते एका नातेवाईकाकडे राहिले होते, असे दाखवण्यात आले आहे. वानखेडे यांनी 17 लाख 40 हजारमध्ये रोलेक्स गोल्ड घड्याळ खरेदी केले. परंतु, या घड्याळ्याची मूळ किंमत 22 लाख 5 हजार आहे. एवढंच नव्हे तर वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावाही या चौकशी अहवालात करण्यात आला आहे. तसेच, मुंबईत त्यांच्या नावे सहा मालमत्ता आहेत, असेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. ( Sameer Wankhede )