मुंबई – अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. मात्र आता सलमान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबईच्या वांद्र्यातील कार्टर रोडवर सलमान १९ मजली अलिशान हॉटेल बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सलमानच्या या नव्या हॉटेल विषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.
सलमान खान वांद्र्याच्या कार्टर रोडवर १९ मजली इमारतीचे हॉटेल बांधणार असून त्याचे हे नवीन हॉटेल सी-फेसिंग असणार आहे. हे हॉटेल सलमानची आई अर्थात सलमा खान यांच्या नावावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने त्याच्या या हॉटेलच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचेही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
या इमारतीचा ऊंची 69.90 मीटर असेल, जे व्यावसायिक हेतूसाठी तयार केला जाणार आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट असेल. यानंतर तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असेल. चौथा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी असेल. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर असेल. यानंतर 7व्या मजल्यापासून 19व्या मजल्यापर्यंत हॉटेलच्या खोल्या असतील.
सलमानचे हे हॉटेल मुंबईतील पॉश भागात असलेल्या भागात बांधले जाणार आहे. या परिसरात अनेक बॉलीवूड स्टार्सची घरे आहेत. परंतु या हॉटेलबाबत सध्या खान कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.