चाकण बाजारभाव ः वांगी, बटाट्याचे भाव तेजीत; कांद्याची आवक घटूनही भावात घसरण
महाळुंगे इंगळे – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये मकर संक्रांतीमुळे लसूण, भुईमूग शेंगा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी व गाजराची विक्रमी आवक झाली. फळभाज्यांच्या बाजारात हिरवी मिरची, वांगी, कारली व दुधी भोपळ्याची आवक घटली. तर फ्लॉवर, भेंडी, दोडका, कारली व गाजराचे भाव स्थिर राहिले.
पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व कोथिंबीरची आवक घटली. शेपू व पालक भाजीची भरपूर आवक झाली. जनावरांच्या बाजारात शेळ्यामेंढ्याच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने भाव स्थिर राहिले. तर जर्सी गाई, बैल व म्हैस यांच्या संख्येत घट होऊनही त्यांचे भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 4 कोटी 50 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण 6,100 क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने घटूनही कांद्याच्या भावात 1,100 रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव 4,600 हजार रुपयांवरून 3 हजार 500 रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 610 क्विंटल झाली.
गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 40 क्विंटलने घटल्याने भावात 500 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 2,000 रुपयांवरून 2,500 रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमुग शेंगांची एकूण आवक 5 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने वाढल्याने कमाल भाव 7,200 रुपयांवर स्थिरावले. लसणाची एकूण आवक 6 क्विंटल झाली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने वाढल्याने कमाल भाव 16 हजार रुपयांवर स्थिरावले. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 375 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 20 क्विंटलने घटूनही भावात घट झाली. हिरव्या मिरचीला 2 हजार ते 3 हजार रुपये असा कमाल भाव मिळाला.
फळभाज्या – आवक डागांमध्ये व कंसात प्रतीक्विंटलसाठी भाव
टोमॅटो 1150 पेट्या (1000 ते 1500), कोबी 462 पोती (400 ते 600), फ्लॉवर 390 पोती (600 ते 1000), वांगी 486 पोती (2000 ते 3000), भेंडी 380 पोती (3000 ते 4000), दोडका 265 पोती (2500 ते 3500), कारली 225 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा 245 पोती (1000 ते 1500), काकडी 398 पोती (1000 ते 1500), फरशी 194 पोती (2500 ते 3500), वालवड 222 पोती (3000 ते 5000), गवार 125 पोती (5000 ते 6000), ढोबळी मिरची 374 डाग (2000 ते 3000), चवळी 220 पोती (2000 ते 3000), वाटाणा 647 पोती (2500 ते 3500), शेवगा – 62 पोती (8000 ते 12000), गाजर 224 पोती (2000 ते 3000).
जनावरे – चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 105 जर्सी गायींपैकी 70 गाईची विक्री झाली. (10,000 ते 60,000 रुपये), 140 बैलांपैकी 90 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 35,000 रुपये), 110 म्हशींपैकी 95 म्हशींची विक्री झाली. (20,000 ते 60,000 रुपये), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 9,550 शेळ्या – मेंढ्यापैकी 8,570 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1,200 ते 10,000 रुपये इतका भाव मिळाला.