पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेने मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी सर्वसामान्यांच्या दारात बॅंड वाजविण्यास सुरूवात केली असली तरी दुसरीकडे शहरातील अवघ्या १७४६ थकबाकीदारांकडे एक कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. या थकबाकीची रक्कम तब्बल ५१८२ कोटी रूपये आहे.
११६१ थकबाकीदार न्यायालयात गेले असून या थकबाकीची रक्कम ३४१५ कोटी रूपयांची आहे. महापालिकेने न्यायालयीन दाव्यांसाठी विशेष कक्ष उभारल्यास अथवा त्यासाठी स्वतंत्र नियोजन केल्यास महापालिकेस मोठे उत्पन्न मिळू शकेल.
मिळकतकराचे दावे गेली अनेक वर्षे न्यायालयात असल्याने महापालिकेस कारवाई करणे शक्य नाही, त्यामुळे हा थकबाकीचा बोजा वाढत आहे. प्रामाणिक करदात्यांवर मात्र कर भरण्यास काही महिने उशीर झाला तरी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याउलट १७४६ मोठ्या दाव्यांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त वसुलीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना बॅंड वाजविण्यावरच अधिक भर दिला जात आहे.
दाव्यात अडकला ३६०० कोटींचा कर…
सजग नागरीक मंचाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एक कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असणारे १७४६ थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडे ५१८२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी ९४ दावे विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. ज्यामध्ये अडकलेली रक्कम ९८८ कोटी रुपये आहे. ज्यात फक्त दोन दाव्यांत अडकलेली रक्कम ५६५ कोटी रुपयांची आहे. तर, मोबाइल टाॅवरचे १०६१ दावे असून यात २४२७ कोटी रुपये रक्कम अडकली आहे. हे दावे अनेक वर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत.
शासकीय वादात अडकले ५६१ कोटी…
कर विभागाकडे असलेल्या एक कोटी रकमेच्या वरील थकबाकीत १९३ मिळकतींबाबत वाद सुरू आहेत. यात प्रामुख्याने शासकीय विभागांचा समावेश आहे. त्यात ७९ कोटी रुपये संरक्षण खात्याची तर ५६ कोटी रुपये महावितरणची थकबाकी आहे. पाटबंधारे खात्याची थकबाकी ७३ कोटी रुपयांची आहे. महापालिकेने बैठका घेऊन तोडगा काढल्यास ही रक्कम महापालिकेस मिळू शकेल.
न्यायालयीन दाव्यात महापालिकेची मोठी थकबाकी अडकली आहे. महापालिकेने यासाठी स्वतंत्र सेल करून ही प्रकरणे तातडीने मार्गी लावल्यास महापालिकेस मोठा निधी मिळणार आहे. अन्यथा हा थकबाकीचा डोंगर वाढणार असून त्यावर व्याजही वाढणार आहे. कराचा भार सर्वसामान्यांवरच असणार आहे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरीक मंच