बेंगळुरू – फुलराणी सायना नेहवाल हिला आगामी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सोपा ड्रॉ मिळाला आहे. या स्पर्धेतून आगामी टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी तिला सरस कामगिरी करावी लागणार आहे.
नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांना ऑलिम्पिक पात्रतेची संधी या स्पर्धेतून मिळणार तर आहेच पण त्यांना स्पर्धेतील साखळीचे सामने नवोदित खेळाडूंशी खेळावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी हा ड्रॉ सोपा ठरणार आहे.
येत्या 13 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून फ्रान्सच्या याले होयॉक्सशी सायनाची तर इंग्लंडच्या टॉबी पेन्टाशी श्रीकांतची लढत होणार आहे.
शुभांकर डे याने जर त्याचा सलामीचा सामना जिंकला तर श्रीकांतला त्याच्याशी दुसऱ्या फेरीत खेळावे लागणार असल्याने हा सामनाही त्याच्यासाठी सोपा ठरणार आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी सायना व श्रीकांतला क्रमवारीतील गुणांमध्ये वाढ करावी लागणार आहे.