मुंबई – हाथरसकडे निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या वर्तनावर चौफेर टीका होत आहे. याबाबत भूमिका मांडताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उत्तर प्रदेश पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री योगींनी संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अशातच आता वाघ यांनी घेतलेल्या या भूमिकेबाबत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुल गांधी, प्रियंका गांधी व काँग्रेस कार्यकर्ते काल हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाले असता त्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर रोखण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्याला पुढे जाऊ देण्याची मागणी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला होता.
दरम्यान, यावेळीचा एक फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून यात एक पुरुष पोलीस अधिकारी प्रियंका गांधींनी परिधान केलेल्या वस्त्राला पकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका महिला नेत्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या वर्तनावरून अनेकांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे.
वाघ यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना तांबे यांनी, “चित्राताई, आपण एक महिला नेत्या म्हणून पक्षीय जोडे बाजूला ठेवून घेतलेली भूमिका स्वागतार्ह्य आहे. मात्र आपलं बोलणं निर्लज्ज योगीनाथ ऐकतील का ? हा प्रश्न मात्र आहेच. पण एक मात्र खरं, पक्ष बदला असला तरीही तुम्ही तुमचे संस्कार व विचार विसरला नाहीत ह्याचा अभिमान आहे.” असं ट्विट केलं आहे.