International Badminton Player B Sai Praneeth Retirement : भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतने रविवारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मधून निवृत्ती जाहीर केली. या स्टार शटलरने वयाच्या 31 व्या वर्षी तिची कारकीर्द संपवली. आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत प्रणीतने 2019 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. 36 वर्षांनंतर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. यापूर्वी 1983 मध्ये प्रकाश पदुकोणने कांस्यपदक जिंकले होते.
दोन दशकांहून अधिक कालावधीच्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, प्रणीतने 2017 सिंगापूर ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद जिंकले होते. त्यानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर तो गंभीर दुखापतीमुळे त्रस्त आहे. 2019 हे वर्ष साई प्रणीतसाठी खूप खास होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याबरोबरच त्याला अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
हैदराबादच्या या स्टार खेळाडूने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली शानदार कारकीर्द थांबवत असल्याची घोषणा केली. त्याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यात प्रणीतने लिहिले आहे की, “भावनांच्या मिश्रणासह, मी निरोप देण्यासाठी आणि 24 वर्षांहून अधिक काळापासून माझी जीवनधारा असलेल्या खेळातून माझी निवृत्ती जाहीर करण्यासाठी हे शब्द लिहित आहे.” तसेच त्याने या पोस्टमध्ये आपल्या कारकीर्दीतील अनेक अविस्मरणीय फोटो शेअर केले आहेत. तसेच बी साईने आपल्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शकांचे, प्रशिक्षकांचे जाहीर आभारही मानले आहेत.
प्रणीत पुढील महिन्यात नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. तो अमेरिकेतील ट्रँगल बॅडमिंटन अकादमीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना दिसणार आहे.