पंजाबचा गतविजेत्या कर्नाटकाला धक्‍का

मुश्‍ताक अली क्रिकेट

अहमदाबाद – जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल व प्रभसिमरन सिंग यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पंजाबने गतविजेत्या कर्नाटकाचा पराभव करून सईद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

निचांकी धावसंख्येच्या सामन्यात 88 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या मनदीप सिंग (नाबाद 35) व प्रभसिमरन सिंग (नाबाद 49) यांच्या नाबाद 85 धावांच्या भागीदारीने पंजाबचा विजय सुकर झाला. त्यांनी 44 चेंडू शिल्लक ठेवून नऊ गडी राखून हा सामना जिंकला.

त्यापूर्वी, पंजाबने नाणेफेक जिंकून कर्नाटकाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांचा डाव सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीसमोर 87 धावांतच आटोपला. त्यांनी आपले चार प्रमुख फलंदाज पहिल्या पॉवर प्लेमध्येच गमावले. देवदत्त पडिक्कल (11), करुण नायर (12), शरथ (2) व पवन देशपांडे (0) असे प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर त्यांची स्थिती पहिल्या सहा षटकांतच 4 बाद 37 अशी झाली होती.

श्रेयस गोपाळ व अनिरुद्ध जोशी यांनी केलेली 25 धावांची भागीदारीच त्यांच्यासाठी सर्वाधिक ठरली. ही जोडी टिकणार असे वाटत असतानाच रमणदीपने गोपाळला (13) बाद केले आणि कर्नाटकाला प्‌ुन्हा एकदा अडचणीत आणले. आठव्या षटकांत त्यांची अवस्था 5 बाद 57 अशी झाली होती. त्यानंतर कर्नाटकाचे तळातील फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत.

संक्षिप्त धावफलक – कर्नाटक सर्वबाद 87 धावा. (अनिरुद्ध जोशी 27, श्रेयस गोपाळ 13, कौल 3-15) पराभूत वि. पंजाब 1 बाद 89 धावा. (प्रभसिमरन सिंग नाबाद 49, मनदीप सिंग नाबाद 35, अभिमन्यू मिथुन 1-11).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.