भोपाळ – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना त्यांच्या घरी आलेल्या टपालातून कोणीतरी विषारी द्रव्ये पाठवली आहेत. तशी तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली आहे. तीन ते चार टपाल पाकिटातून त्यांना ही द्रव्ये पाठवण्यात आली असून त्यात उर्दू भाषेतील पत्रेही आहेत. ही पत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या पाकिटांमध्ये असलेले रासायनिक द्रव्य तपासासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भोपाळच्या कमला नगर पोलिस ठाण्यात या विषयी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साध्वी प्रज्ञा यांना या टपालातून जी उर्दु भाषेतील पत्रे पाठवण्यात आली आहेत त्याचा तपशील अजून समजलेला नाही. पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तपास सुरू केला आहे अशी माहिती भोपाळचे पोलिस अधिक्षक उमेश तिवारी यांनी दिली.