उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोलीस महासंचालकांना निर्देश
मुंबई : राज्यातील विशेषत: नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून नागपूरमधील गुन्हेगारी ही राजकीय नेतृत्वासाठी टीकेचे कारण झाली आहे. या गुन्हेगारीचा नागरिकांना होणारा हा त्रास यापुढे कायम राहू नये यासाठी राजकीय लागेबांधे न बघता गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
दरम्यान, पूर्व उपनगरातील वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी थेट दक्षिण मुंबईला जोडण्यात आलेला मुंबईतील “इस्टर्न फ्री वे’ मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश पवार यांनी नगरविकास विभागाला दिले.
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच “इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन या मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना अजित पवार यांनी केली.
एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या.