मुंबई :- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर येत्या 1 नोव्हेंबरला मोठा गौरव होणार आहे. या मैदानात सचिनचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार असून 1 नोव्हेंबरला या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यानच हा सोहळा होणार आहे.
सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताचा सामना याच मैदानावर श्रीलंकेशी होणार आहे. असा पुतळा बसवणार असल्याची घोषणा मुंबई क्रिकेट संघटनेने आधीच केली होती. वानखेडे स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळच सचिनचा पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे. याच स्टेडियमवर सचिन आपला अखेरचा 200 वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता व निवृत्त झाला होता. वानखेडे स्टेडियमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. मात्र आता सचिनचा पुतळाही आपल्याला दिसणार आहे.
सचिन रमेश तेंडुलकर याची ओळख क्रिकेटचा देव अशीही आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न हा पुरस्कार मिळविणारा तो पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला हा एकमेव क्रिकेटपटू आहेत. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
सचिनची जी मुख्य मूर्ती आहे, त्याची उंची दहा फूट आहे. त्याच्यावर जी बॅट आहे ती चार फुटांची आहे. अशी एकूण १४ फूट उंचीची मूर्ती आहे. त्याच्या खाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारला आहे. ज्यामधून जगाचा नकाशा उलगडला आहे. त्या चेंडूच्या पॅनलवर सचिनचे विक्रम हे नमूद केलेले आहेत. यासह सचिनच्या कामगिरीला उद्देशून एक वाक्यही असणार आहे. सचिनचा हा पूर्णाकृती पुतळा कांस्याचा बनवला आहे. त्याच्या खाली असलेला चेंडूही कांस्याचा बनवण्यात आला आहे.
1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने फलंदाजीत अनेक विक्रम केले आहेत. आता पुतळा उभारुन त्याचा अनोखा सन्मान करण्यात येत आहे. सचिन याने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) आणि धावा (34,357) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.