World Cup 2023 Australia vs Pakistan Match Live Score : विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सलग दुसऱ्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. गेल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बाबर आझमचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे.
ऑस्ट्रेलियाने टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 367 धावा केल्या आहेत. विजयासाठी 368 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने दमदार सुरूवात केली आहे. पाकिस्तानचे सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनी अर्धशतके पूर्ण केली आहेत. दोघेही चांगली फलंदाजी करत असून पाकिस्तान संघ विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा 20 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद 131 इतकी झाली आहे. अब्दुल्ला शफीक नाबाद 62*(58) आणि इमाम उल हक 62*(62) धावांवर खेळत आहेत.
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केलेला नाही.
सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्या शानदार दीडशतकी आणि मिचेल मार्शच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 367 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवलं.
ऑस्ट्रेलियाकडून दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने 163 आणि मिचेल मार्शने 121 धावा केल्या. मार्शने 108 चेंडूत 121 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 9 षटकार मारले. वाॅर्नर 124 चेंडूत 163 धावा करून बाद झाला. त्याने 14 चौकार आणि नऊ षटकार मारले. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 25 धावांचा पल्ला गाठता आला नाही.
मार्कस स्टॉइनिसने 21 धावा केल्या. जोश इंग्लिशने 13 धावांचे योगदान दिले. मार्नस लॅबुशेन आठ धावा करून बाद झाला तर स्टीव्ह स्मिथ सात धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने सहा आणि मिचेल स्टार्कने दोन धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड खातेही उघडू शकले नाहीत. एडन झाम्पा 1 धाव काढून नाबाद राहिला.
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 54 धावा देताना सर्वाधिक 5 बळी घेतले. आफ्रिदीने मिचेल मार्श,ग्लेन मॅक्सवेल,मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केलं. हरिस रौफने तीन गडी बाद केले मात्र त्याने 8 षटकात 83 धावा दिल्या. उसामा मीरनेही एक विकेट घेतली मात्र त्याने 9 षटकात 82 धावा दिल्या.
दोन्ही सलामीवीरांनी झळकावली शतके…
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानविरुद्ध आपापली शतके पूर्ण केली. वॉर्नरने 31व्या षटकात मोहम्मद नवाजच्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले तर मिचेल मार्शने पुढच्याच चेंडूवर चौकार मारून शतक झळकावले. वॉर्नरचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 21 वे शतक तर मार्शचे हे दुसरे शतक आहे. विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्यांदाच दोन्ही सलामीवीरांनी एकाच सामन्यात शतकी खेळी खेळली आहे.
दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 107 सामने झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं 69 तर पाकने 34 सामन्यात विजय मिळविला आहे. तर 3 सामने अनिर्णत आणि एका सामना टाय झाला आहे. 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ 10 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने सहा सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.