नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यादीत सगळ्याच प्रमुख नेत्यांची नावे आहेत. मात्र त्यातून राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि असंतुष्ट नेते सचिन पायलट यांचे नाव वगळण्यात आले आहे. पक्षाच्या गाइडलाइन विरोधात जाणाऱ्या पायलट यांना कॉंग्रेसने हा थेट संदेश दिला असल्याचे मानले जाते आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिध्दरामैय्या, जगदीश शेट्टर, शशी थरूर आणि अन्य काही नेत्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. पायलट यांना मात्र हात दाखवण्यात आला आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु आदी नेत्यांचीही नावे यादीत आहेत. इतकेच नव्हे तर मोहम्मद अझरूद्दीन, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार आणि बराच काळ पक्षापासून लांब राहीलेले राज बब्बर व दिव्या संपदना यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे.
पायलट यांना मागणी
सचिन पायलट हे कॉंग्रेसमधील एक लोकप्रिय नेते आहेत. युवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता असते. तसेच गांधी कुटुंबानंतर सचिन पायलट यांची सभा घेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. असे असूनही कॉंग्रेसने त्यांना यादीतून वगळले आहे त्याचे कारण त्यांनी राजस्थानात पक्षाचा आदेश झुगारत केलेले एक दिवसाचे उपोषण. पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. पायलट यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे मात्र गेहलोत यांच्यामुळे अद्याप ती सफल होऊ शकलेली नाही.