हैदराबाद – आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच भारतीय क्रिकेटमध्ये एक सनसनाटी घटना उघडकीला आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज महंमद सिराज याला एका सट्टेबाजाने संपर्क साधल्याचे समोर आले असून याबाबत सिराजने बीसीसीआयला कळवले होते. अखेर हैजराबाद येथे एक ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या या सट्टेबाजाला अटक करण्यात आली आहे. या सट्टेबाजाने अनेक सामन्यांवर सट्टा लावल्याचे व त्यात त्याला प्रचंड नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळेच त्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्यात आयपीएलपूर्वी पार पडलेल्या मालिकेदरम्यान सिराजशी संपर्क साधला होता व त्याला मोठ्या रकमेचा प्रस्तावही दिला होता. संघ, सामना तसेच सर्व काही स्थितीबाबत सविस्तर माहिती दिलीस तर तुला मोठी रक्कम मिळेल, असा प्रस्ताव या सट्टेबाजाने सिराजला दिला होता. सिराजने लगेचच ही गोष्ट बीसीसीआयला कळवली व त्याचा तपास केल्यावर पोलिसांनी या सट्टेबाजाच्या मुसक्या हैदराबाद येथून आवळल्या आहेत. भ्रष्टाचार विरोधी समिती ऍक्शनमोडमध्ये सिराजने सांगितलेल्या घटनेनंतर बीसीसीआयची भ्राष्टाचार विरोधी समिती ऍक्शनमोडमध्ये आली व त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला व या व्यक्तीची सर्व माहिती दिली. त्यानुसार तपास यंत्रणा कामाला लागली व तातडीने या सट्टेबाजाची उचलबांगडी करण्यात आली आहे. आता पुढील तपास व याबाबतची अधिकृत माहिती बीसीसीआयकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.