किव्ह – मारिऊपोल बंदराच्या उपनगरांच्या परिसरामध्ये रशियाच्या फौजांनी आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. मारिऊपोलमध्ये अडकलेल्या नागरिकांना तेथून सोडवण्याची काही आशा अलिकडच्या काळात निर्माण झाली होती. त्याचवेळी रशियाने हल्ले वाढवल्यामुळे आता ती शक्यता धूसर झाली आहे.मारिऊपोलबरोबर रशियाने डोनबासमधील एका चिंचोळ्या औद्योगिक भागावरही हल्ले तीव्र केले आहेत.
या भागामध्ये युक्रेनच्या कोळशाच्या खाणी, स्टील प्रकल्प आणि अनेक फॅक्टऱ्या आहेत. राजधानी किव्ह जिंकण्यात रशियाला अपयश आल्यानंतर आता डोनबासवर विजय मिळवण्यासाठी रशियाच्या फौजा आगतिक झाल्या आहेत. युरोपातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प असलेला अझोवस्तल प्रकल्प ताब्यात घेण्यास रशियाचे प्रधान्य आहे. त्यासाठी युक्रेनच्या स्टील प्रकल्पांवर रशियाकडून जोरदार बॉम्बवर्षाव केला जाऊ लागला आहे.
रशियाने एका रुग्णालयांवर देखील बॉम्बफेक केल्याचे वृत्त आहे. मात्र त्याचे अधिकृत समर्थन होऊ शकलेले नाही. रशियाने 73 हवाई हल्ले आणि सुमारे हजार ठिकाणी जमिनीवरून हल्ले केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेनच्या फौजा ज्या भागात आहेत, त्या दक्षिण युक्रेनमधील खेरसोनच्या भागात क्षेपणास्त्रांचे हल्लेही करण्यात आले आहेत.