पुणे – भर रस्त्यावर पत्नीच्या डाव्या हातावर सुरा मारून जखमी करणाऱ्या दारूड्या पतीला एक वर्ष कारावास आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
राहुल ज्ञानोबा खिल्लारे (वय 40, रा. बावधन, मूळ. अनसिंग, ता.जि.वाशिम) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी ज्योती (वय 37) यांनी याबाबत हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस शंकर फलके, सोमनाथ भोरडे आणि ज्ञानेश्वर शेवरे यांनी मदत केली.
फिर्यादी बावधन येथे तीन मुलांसह खोली भाड्याने घेऊन राहत होती. पती त्यांच्याकडे राहत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. 15 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 6.45 च्या सुमारास त्या खोलीतून बाहेर पडल्या होत्या. डोक्यावर पाण्याची बादली घेऊन चालल्या होत्या. त्यावेळी राहुल तिला शिवीगाळ करू लागला. पिशवीतून सुरा काढून डाव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.