पॅरिस : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर या सर्व परिस्थितीची अंत्यत गंभीरपणे चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशंनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीसाठी निघाल्या देखील आहेत. या पार्श्वभूमीवर आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने गंभीर इशारा दिला आहे.
रशियाच्या आक्रमक हालचालींमुळे युक्रेनमधली परिस्थिती गंभीर बनलेली असताना आता अमेरिकेकडून अशा प्रकारचे विधान आल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. रशियन फौजांनी आता युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य केले आहे. कीवमधल्या अनेक इमारती रॉकेट हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र, तरीदेखील युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की कीवमध्येच असून त्यांनी रशियन फौजांचा सामना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महत्वाचे विधान केले आहे.
एका रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी रात्री दिलेल्या निवेदनामध्ये तिसऱ्या जागतिक महायुद्धाचा उल्लेख केला आहे. “जर तिसरं जागतिक महायुद्ध टाळायचं असेल, तर रशियावर निर्बंध घालणं अत्यावश्ययक आहे”, असे बायडेन म्हणाले आहेत.
“तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरं जागतिक महायुद्ध सुरू करा आणि थेट रशियन सैन्याशी आमने-सामने लढा. किंवा दुसरा म्हणजे जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्यांच्या विरोधात वागतोय, त्या देशाला त्यासाठी किंमत चुकवायला लावा”, असे बायडेन म्हणाले आहेत. “हे निर्बंध कसे असतील त्याचा नेमकं स्वरूप आत्ता सांगणं कठीण आहे. पण मला वाटतं हे आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वात गंभीर निर्बंध असतील. रशियाला या वर्तनासाठी मोठी किंमत चुकवावी लागेल. नजीकच्या भविष्यकाळातही आणि विशेषत: दीर्घकाळात”, असा इशारा देखील जो बायडेन यांनी दिला आहे.