पॅरिस : युक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने नकार दिला. यावरूनच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी एका भवनिक भाषणामध्ये नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेनवर म्हणजेच नाटोवर तीक्ष्ण शब्दात टिका केली आहे.
नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे याच नाटोमध्ये युक्रेनला प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर रशियाने आक्षेप घेतला होता, तर युक्रेनने या देशांसोबत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. मात्र आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोलाच लक्ष्य केले आहे.
नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित न केल्याने रशियाला फायदा होणार आहे असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. त्याचप्रमाणे नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने युक्रेनवर रशियाकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांमध्ये वाढ होईल अशी भीतीही झेलेन्स्कींनी व्यक्त केली आहे.
याविषयी बोलताना झेलेन्स्की यांनी,“आजपासून यापुढे ज्या लोकांचा मृत्यू होईल त्याला कुठेतरी तुम्ही सुद्धा जबाबदार असाल. तुमच्या नेतृत्वामुळे, तुमच्यामध्ये निर्णय घेण्याइतकी एकता नसल्यामुळे या मृत्यूंसाठी तुम्हालाच जबाबदार धरावं लागेल,” असे म्हटले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा देशाला संबोधित करताना केलेल्या भाषणात झेलेन्स्कींनी हा मुद्दा मांडला. “युक्रेनमधील शहरांवर आणि गावांना नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार देत या संघटनेने बॉम्बहल्ले करण्यासाठी हिरवा कंदील दाखवलाय,” अशी टीका झेलेन्स्कींनी केली.
युक्रेनला नो फ्लाय झोन तसे केल्यास त्याची परिणती युरोपात अण्वस्त्र सज्ज रशियाशी युद्ध भडकण्यात होऊ शकते, असा इशारा ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी शुक्रवारी दिला. ते म्हणाले की आम्ही युक्रेनमध्ये प्रवेश करणार नाही, ना जमिनीवर ना हवाई क्षेत्रात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हवाई वाहतूक निषिद्ध क्षेत्र जाहीर करण्याचे आवाहन पाश्चिमात्य देशांना केले होते.
रशिया युक्रेनवर ‘क्लस्टर बॉम्ब’चा मारा करीत असल्याचा आरोप नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केला. रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करीत असल्याचे आम्ही पाहिले आहे. रशियाच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे स्टॉल्टनबर्ग यांनी ब्रसेल्समध्ये पत्रकारांना सांगितले.